मुंबई - घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर येथील शाहीद स्मारक सभागृह येथे 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध धम्मपरिषद घेण्यात आली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे असे प्रतिपादन केले.
बौद्ध धम्म परिषद घेऊन या ठिकाणी भिक्खू संघाला आठवले यांच्या हस्ते चिवरदान करण्यात आले. दरवर्षी धम्मचक्र दिनाला मी नागपुरात असतो. मात्र, यावर्षी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे नागपूरला जाता आले नसल्याचे आठवले म्हणाले.
14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली याचा आम्हाला अभिमान असल्याचे आठवले यांनी सांगितले.
नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत बोलताना भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे असे सांगत जगाला बुद्धांच्या शांतीच्या, विचारांची गरज असल्याचे आठवले म्हणाले. फक्त देशाच्या प्रगतीसाठी नसून संपूर्ण जगाच्या हितासाठी बुद्धांनी दिलेला अहिंसा आणि शांतीचा विचार आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.