मुंबई - दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांना आरोग्याप्रती जागरूक करण्यासाठी आणि 'आरोग्य म्हणजेच सर्व काही आहे' हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. आजच्या या दिनाच्या पार्श्वभूमीवर कलाकार चेतन राऊत यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आरोग्य सेवकांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा... आनंदवनमध्ये तयार केले गोधडीपासून मास्क, एक लाख मास्कची तयारी
कोरोना विषाणू या जागतिक महामारीमुळे आजच्या या दिनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व डॉक्टर आपल्या कर्तव्यावर आहेत. अशा डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी कलाकार चेतन राऊत यांनी 'पुश पिन'च्या माध्यमातून एक आगळीवेगळी कलाकृती तयार करत त्यांना सलाम केला आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करून ज्यांनी ज्यांनी या कोरोनाच्या लढ्यात साथ दिली, त्यांचे पोर्ट्रेट त्यांनी साकारले आहे. अशा डॉक्टरांना मानवंदना म्हणून 6 रंगछटा असलेल्या 4,266 पुश पिनचा वापर करून राऊत यांनी पोर्ट्रेट साकारले आहे. 24 बाय 30 इंच असे हे पोर्ट्रेट आहे. 'डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला पाहिजे. दिवस रात्र कोरोना विरुध्द ते लढत आहेत' असे राऊत यांनी सांगितले. या आधीही चेतन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योजक रतन टाटा, अभिनेता अक्षय कुमार यांचेही पोर्ट्रेट साकारले होते.