मुंबई- शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात ईडीकडून सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या माफीच्या साक्षीदार अर्जाला ईडीकडून मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र ईडीने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात दिले आहे. मात्र अंतिम निर्णय कोर्ट देणार आहे. उद्या या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी देखील सचिन वसे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय कोर्टाने माफीचा साक्षीदार म्हणून मंजुरी दिली आहे.
अनिल देशमुखांसह 4 जणांविरोधात गुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सह चार जणांविरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा समावेश आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार