मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी आक्षेप घेतला ( Chandrakant Patil On Nana Patole ) आहे.
राणेंवर कारवाई मग पटोलेंवर का नाही?
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर कारवाई केली जाते मग नाना पटोले यांच्यावर का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांच्या विरोधात नाशकात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलीस दबावाखाली काम करत आहेत. याविरोधात आम्ही राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असून, न्यायालयातही दाद मागणार आहे, असे ते म्हणाले.
नवाब मालिकांवरही आक्षेप
एकीकडे पटोले म्हणतात मोदींना मारू, नवाब मलिक म्हणतात फडवणीस यांना काशीचा घाट दाखवू, अशी वक्तव्ये केली जात आहेत. फडणवीसांना काशीचा घाट दाखवणार असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्यालाही चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला. नाना पटोले म्हणतात की, मोदींना मारू, नवाब मलिक म्हणतात फडवणीस यांना काशीचा घाट दाखवू, अखेर राज्यात हे काय सुरू आहे असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेले वक्तव्य आता त्यांच्याच अंगाशी आले आहे. असे सांगत जोपर्यंत या प्रकरणी नाना पटोले यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
गडकरीही संतापले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केलं आहे. नाना पटोलेंना अटक केली जावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.