मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बुधवार (दि. १६ मार्च)पासून १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील लहान मुलांना कॉर्बेव्हॅक्स ( Corbevax Vaccine ) ही लस दिली जाणार असून १२ केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजेपासून हे लसीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी, २०२१ पासून कोरोना आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षांवरील वयोवृद्ध, ४५ वर्षांवरील आजार असलेले नागरिक, त्यानंतर १ मे, २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे आणि ३ जानेवारी, २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याचाच पुढील भाग म्हणून बुधवारी १६ मार्चपासून १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. प्रायोगिक १२ लसीकरण केंद्रांच्या अभ्यासानंतर इतर सर्व केंद्रांवर १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
एक लाख २२ हजार डोस प्राप्त - १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांची त्या-त्या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष करण्यात येणार आहे. यामध्ये दिनांक १ जानेवारी, २००८ ते दिनांक १५ मार्च, २०१० पूर्वी जन्मललेले लाभार्थी पात्र असतील. १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कॉर्बेव्हॅक्स ही लस ( Corbevax Vaccine ) हातावर स्नायूमध्ये देण्यात येणार आहे. लसीच्या २८ दिवसांच्या अंतरावर लसीची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. पालिकेला कॉर्बेव्हॅक्स लसीचे १ लाख २२ हजार डोस प्राप्त झाले असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली.
१२ वर्षे पूर्ण झालेल्यांचेच लसीकरण - सद्यस्थितीत केंद्र शासनामार्फत कोविन प्रणालीमध्ये या लसीकरणासंदर्भात आवश्यक बदल उद्या सकाळपर्यंत होणे अपेक्षित आहेत. कोविन प्रणालीत आवश्यक बदल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाईल. केंद्र शासनामार्फत कोविन प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्यामुळे १२ वर्षे पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांचीही लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते. पण, पालकांनी आपल्या १२ वर्षे पूर्ण झालेल्याच पाल्याचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.
- लसीकरण केंद्रांची यादी
- ई विभाग - टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल
- ई विभाग - ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल
- एफ उत्तर विभाग - लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)
- एफ दक्षिण - राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय, परळ
- एच पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बी. के. सी.) जंबो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व)
- के पूर्व - सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व)
- के पश्चिम – डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)
- पी दक्षिण - नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगांव (पूर्व)
- आर दक्षिण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम)
- एन विभाग - राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)
- एम पूर्व विभाग – पंडीत मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी
- टी विभाग - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड
हेही वाचा - फडणवीसांनी वक्फ बोर्डवर केलेले आरोप खोटे - वक्फ बोर्ड चेअरमन वजाहत मिर्झा