मुंबई - बाहेरून मनमोहक आणि आकर्षित करणाऱ्या चकचकीत हॉटेलचे किचन कसे असेल याची उत्सुकता अनेक ग्राहकांना असते. यासाठी शिवसेनेच्या नगरसेविकेने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांना हॉटेलच्या स्वयंपाकघरात पाहण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात यावी. त्यासाठी पालिकेने परवाना देताना तशी अट घालावी, अशी ठरावाची सूचना नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी महापालिका महासभेत केली.
हॉटेलच्या किचनमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने काही महिन्यांनापूर्वी मुंबईतील शेकडो हॉटेल्सचे परवाने रद्द केले. मुंबईत अनेक हॉटेलचा दर्शनी भाग सुशोभित व आकर्षक असतो. मात्र, स्वयंपाकघर अस्वच्छ असते. याचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना हॉटेलचे उपहारगृह पाहण्याची परवानगी मिळणे आवश्यक असल्याची ठरावाची सूचना नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी मांडली.
नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी मांडलेली ही सूचना सत्यात येते का? आणि पालिका यावर अंमलबजावणी करते का? हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. मात्र, यासुचनेवर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने हा ठराव मंजूर केल्यास प्रत्येक ग्राहक हॉटेलचे किचन पाहण्यासाठी पुढे येईल. याऐवजी ग्राहकाला सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे हॉटेलचे किचन पाहण्यासाठी उपलब्ध करून देता येईल, तशी सोय आम्ही आमच्या हॉटेलमध्ये केल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले आहे.