मुंबई - काल सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस ठाण्यात गेली होती. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती तातडीने पोलीस ठाण्यात का गेली? काहीतरी संशयास्पद आहे, असे म्हणत रिया चक्रवर्ती व मुंबई पोलिसांवर भाजप आमदार भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.
आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, काल सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती तात्काळ वांद्रे पोलीस ठाण्यात गेली. तिने इन्स्टाग्राम पोस्टवरून पोलीस सुरक्षा मागितली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी लगेच तिला पोलीस सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे पोलीस सुरक्षेचा खर्च कोण करणार? रिया चक्रवर्ती ही वांद्रे पोलीस ठाण्यात सीबीआयने काय चौकशी केली, काय विचारलं याबद्दल आपल्या राजकीय बॉसना पोलिसांच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्यासाठी गेली होती का? याची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते व आमदार भातखळकर यांनी केली.
रियाला ज्याप्रकारे पोलीस सुरक्षा इन्स्टाग्राम पोस्टवरून आव्हान करताच पुरवली गेली, त्याचप्रकारे सुशांतच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप मेसेजवरून केलेल्या मागणीनंतर का सहकार्य केले नाही, असा देखील प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केलेला आहे.