मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 3 आणि 4 जुलैला विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचीही निवड होणार आहे. मात्र, हे सर्व होत असताना सत्तेत असलेले महाविकास आघाडीलाही विरोधी पक्षनेते ठरवावे लागणार आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त असल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीकडून विधानसभा विरोधी पक्ष नेत्यासाठी कोणाच्याही नावाची निश्चिती करण्यात आलेली नाही. लवकरच तिन्ही पक्ष एकत्र बसून विधानसभा विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करू, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP Leader Jayant Patil ) यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीत तीन नावांची चर्चा - विधानसभा विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल हे निश्चित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar ), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, छगन भुजबळ हे मुरब्बी राजकारणी असले तरी सध्या त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांनाही जबाबदारी दिली जाईल का.?, असाही प्रश्न उद्भवत आहे. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर बसून अजित पवार सरकारी पक्षाला जेरीस आणण्याचे काम करू शकतील का?, कारण सत्तेत असताना आयकर विभागाच्या धाडी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी पडल्या होत्या. जवळपास तीन दिवस याबाबतची चौकशी सुरू होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर बसल्यानंतरही त्यांच्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जाऊ शकतो अशा प्रकारची ही चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. तसेच जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष आहेत. संपूर्ण पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने दुसरी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाईल का?, असेही प्रश्न राष्ट्रवादीत उपस्थित होत आहेत. त्यामुळे या तीन नावांच्या व्यतिरिक्त वेगळे नाव राष्ट्रवादीतून विधानसभा विरोधी पक्षनेत्या साठी येऊ शकतो अशीही चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - Uddhav in Action : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी