मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या मंत्रीमंडळ बैठकीला ( cabinet meet ) बोटावर मोजण्याएवढेच मंत्री उपस्थित होते. सरकार गडगडण्याच्या दिशेने असताना शिवसेनेच्या (ShivSena ) अनेक मंत्र्यांसह काँग्रेस ( Congress ), राष्ट्रवादी काँग्रेसच्याही ( NCP ) काही मंत्री बैठकीकडे फिरकलेच नाहीत. राज्य मंत्रीमंडळात एकूण 46 मंत्री आहेत. त्यातील अनेकांनी या बैठकीला दांडी मारली.
राज्य मंत्रीमंडळातील स्थिती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकूण 46 मंत्री आहेत. यामद्ये कॅबिनेट मंत्री 30, राज्यमंत्री 13 आहेत. यातील अगदी मोजकेच मंत्री शेवटच्या घटका मोजत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस दोन मंत्री अनुपस्थित - या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये काँग्रेसचे 10 मंत्री आहेत. आजच्या बैठकीला सुनील केदार आणि वर्षा गायकवाड हे दोघे अनुपस्थित राहिले. तर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, असलम शेख, विजय वडेट्टीवार, के. सी पाडवी हे आठ मंत्री उपस्थित होते. मंत्रीमंडळातील दोन राज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्वजीत कदम हे दोघे बैठकीस उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस नऊ मंत्री बैठकीत हजर - राष्ट्रवादी काँग्रेसचे या मंत्रीमंडळात 11 मंत्री आहेत. यापैकी अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघे ईडीच्या कारवाईनंतर सध्या कोठडीत आहेत. यातील अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला आहे तर नवाब मलिक अद्यापही बिनखात्याचे मंत्री आहेत. हे दोघे वगळता अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे दोन राज्यमंत्री आहेत. दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे हे दोघेही यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेचे सर्वाधिक मंत्री अनुपस्थित - या मंत्रीमंडळ बैठकीला शिवसेनेचे सर्वात जास्त मंत्री अनुपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उदय सामंत आणि दादा भुसे ऑनलाईन तर सुभाष देसाई, अनिल परब मंत्री प्रत्यक्षात उपस्थित होते. एकनाथ शिंदे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख हे मंत्री अनुपस्थित होते. तर राज्यमंत्र्यांमधील अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र पाटील - यड्रावकर अनुपस्थित हे अनुपस्थित होते. प्राजक्त तनपुरेही अनुपस्थित होते. मात्र ते सध्या कुठे आहेत याची माहिती उपलब्ध नाही.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : मंत्रिमंडळाची बैठकही टाय टाय फीस