मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले असल्याच सांगितलं. यामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या कोंडीत सापडली आहे. हे पत्र समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर तिथेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची यानंतर बैठकांसाठी धावपळ सुरू झाली आहे.
परमवीर सिंग यांची थेट तडकाफडकी बदली-
जवळपास एक वर्षापूर्वी परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्ताची धुरा सांभाळली होती. मात्र सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट नैतिक जबाबदारी म्हणून परमवीर सिंग यांची थेट तडकाफडकी बदली केली. त्यानंतर परमविर सिंह हे नाराज असल्याची चर्चा पोलीस विभाग तसेच राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यानंतर थेट परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अवैद्यरित्या आपल्याला महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याच सांगितलं असल्याचं पत्रात नमूद केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्तची जबाबदारी स्वीकारली होती. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलीस तपासासंदर्भात त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तसेच टिआरपी घोटाळ्यात देखील त्यांनी पत्रकार परिषद घेत देशभराच लक्ष या प्रकरणाकडे वळवळ होतं. टिआरपीमध्ये फेरफारप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्हीवर आरोप केले. त्यामुळे परमबीर सिंह चर्चेत आले आहेत.
परमवीर सिंग यांची कारकीर्द-
परमबीर सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून 2016 मध्ये काम पाहिले होते. ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या टीमने मीरारोड भागात फेक कॉलसेंटर छापा मारला होता.
भारतातील या सर्वांत मोठ्या फेक कॉलसेंटरच्या तपासासाठी एफबीआयची टीम भारतात आली होती. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा यापदी नेमण्यात आले. अतिरिक्त पोलीस महासंचालक असताना कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालत हे प्रकरण हाताळले होते. गेल्यावर्षीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट सिंग यांनीच दिली होती.
हेही वाचा- आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी