मुंबई - कॉर्पोरेट जगातील सर्वात मोठे नाव असलेले इंद्राणी मुखर्जी ( Indrani Mukherjee ) हिला 2015 मध्ये स्वतःच्याच मुलगी शीना बोराची हत्या केलेल्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून अटक केली होती. तब्बल साडे सहा वर्षापेक्षा अधिक काळ इंद्राणी मुखर्जी भायखळातील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे साडे 6 वर्षानंतर कारागृहातून इंद्राणी मुखर्जीचा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया की नेमकी इंद्राणी मुखर्जी कोण आहेत. ज्यांच्यावर स्वतःचीच मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा आरोप आहे.
इंद्राणी मुखर्जी यांच्याबद्दल थोडक्यात - इंद्राणी मुखर्जी या ब्रिटिश माजी एचआर सल्लागार आणि मीडिया एक्झिकेटिव्ह होत्या. आयएनएक्स या मीडिया हाऊसेचे माजी संचालक पीटर मुखर्जी सोबत इंद्राणीने लग्न केले होते. हे तिचे तिसरे लग्न होते. आता त्यांच्या घटस्फोट झाला आहे. 2007 मध्ये तिने पती पीटर मुखर्जी सह INX मीडियाची स्थापना केली होती. या मीडिया हाऊसमध्ये इंद्राणी सीईओच्या भूमिकेत वावरत होती. 2009 मध्ये तिने कंपनीचा राजीनामा दिला आणि नंतर तिने आपला हिस्सा विकला होता. ऑगस्ट 2015 मध्ये, तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि तिची मुलगी शीना बोराच्या कथित हत्येची मुख्य आरोपी म्हणून इंद्राणीची नवी ओळख समोर आली.
इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांचा घटस्फोट - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोघांत कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. ८ नोव्हेंबर २००२ ला स्पेशल मॅरेज कायद्यानुसार व हिंदू पद्धतीनुसार पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचा विवाह झाला होता. दरम्यान, याआगोदर इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून पीटर मुखर्जीला तुरुंगातच सोडचिठ्ठीची नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यात दोघांच्याही एकमतानुसार लंडन, स्पेनसारख्या शहरातील संपत्ती आणि बँक खात्यातील फिक्स डिपॉझिट आणि इतर मालमत्तेची दोघांमध्ये समान वाटणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्व मागण्यांना पीटर मुखर्जी तयार झाला होता. दोघेही विवाह बंधनातून वेगळे होण्यासाठी सहमतीने तयार झाले असल्याने दोघेही कायदेशीररीत्या आता विभक्त झाले.
शीना बोरा नेमकी कोण ?
शीनाची हत्या का झाली? हे प्रकरण नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी शीना बोरा कोण होती हे जाणून घेऊया. शीना बोरा ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी होती. इंद्राणी 'मीडिया टायकून' म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी. त्यामुळे शीना बोरा, पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली, असल्याचा आरोप आहे. शीनाची हत्या तिचीच आई इंद्राणीने केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. तिचा पहिला पती हा सिद्धार्थ दास. त्रिपुरा येथील टी स्टोअर ओनर असलेला सिद्धार्थ दास हा तिचा पहिला पती होता. सिद्धार्थपासून इंद्राणीला झालेली मुलगी म्हणजे शीना बोरा. नंतर इंद्राणीने कोलकतामधील व्यापारी संजीव खन्ना याच्यासोबत दुसरे लग्न केले. इंद्राणीचे तिसरे लग्न झाले ते मीडिया टायकून पीटर मुखर्जींसोबत. या दोघांमध्ये 16 वर्षांचे अंतर होते. इंद्राणीसोबत तिची मुलगी शीना राहातो होती. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचं सांगितले. अशातच पीटर मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.
शीना बोरा हिची हत्या झाल्याचा असा झाला खुलासा - 21 ऑगस्ट 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीत श्यामने तो एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करण्यात सहभागी होता असा धक्कादायक खुलासा केला होता. श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही शामिल होता. अशी माहिती राकेश मारिया पुस्तकात देणात आलेली आहे.
श्यामला शीनाचा मृतहेद कुठे टाकण्यात आला त्याठिकाणी घेऊन जाण्यास पोलिसांनी सांगितलं. शीनाचा मृतदेह रायगडमधील गागोदे गावाजवळ एका निर्मनुष्य ठिकाणी टाकण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. शीनाचा खून झाला त्यादिवशी संजीव खन्ना कोलकात्याहून मुंबईत आला होता. इंद्राणी आणि शीना मुंबईतील वांद्रेमध्ये भेटल्या. गाडीत इंद्राणी, शिना, ड्रायव्हर श्याम राय आणि संजीव खन्ना होते. ठरल्याप्रमाणे गाडी मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजच्या गल्लीमध्ये आली. गाडीतच शीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतहेद लपवण्यासाठी आणलेल्या सूटकेसमध्ये भरण्यात आला. त्यानंतर गाडी इंद्राणी मुखर्जी यांच्या वरळीतील घराच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी रायगडमध्ये मृतदेह जाळून टाकण्यात आला. पोलिसांनी शीना बोराच्या मृतदेहाचे अवषेश रायगडमधून जप्त केले होते. हे अवयव तपासणीसाठी सर. जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
शेना बोराचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो? एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असेही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केले होते.
अंडर ट्रायल कैद्यांमध्ये सर्वाधिक जास्त काळ? प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी स्वतःच्या मुलीची हत्या केल्यानंतर साडेसहा वर्षापेक्षा अधिक मुंबईतील महिला भायखला जेलमध्ये आहे. मुंबईतील सर्वाधिक काळ महिला जेलमध्ये अंडर ट्रायल कैद्यांमध्ये सर्वाधिक जास्ती राहणारे महिला कैदी असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईतील भायखळा जेलमध्ये गुन्हेगारी महिलांना ठेवण्यात येते. या जेलमध्ये अंडरवर्ल्डशी संबंधित महिलांपासून छोटे मोठे गुन्हे करणाऱ्या महिलांना ठेवण्यात आले, मात्र सर्वाधिक अंडर ट्रायल कैद्यांमध्ये असलेली इंद्राणी मुखर्जी ही मुंबईतील पहिले गुन्हेगार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शीना बोरा आणि राहुल मुखर्जी -
मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जीने शीना आणि मिखेल या आपल्या दोन मुलांना गुवाहाटीत आपल्या आई-वडिलांकडे सोडले होते. मॅगजिनमध्ये इंद्राणी मुखर्जीचा फोटो पाहिल्यानंतर शीनाला तिने पीटर मुखर्जीसोबत लग्न केले असल्याची माहिती दिली. यानंतर शीनाने मुंबई गाठत इंद्राणीची भेट घेतली. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचे सांगितले. पण 2012 मध्ये ती अचानक गायब झाली. शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेली असल्याचे सांगण्यात आले होते.
मुख्य साक्षीदार राहुल मुखर्जी - याप्रकरणातील मुख्य साक्षीदार शीना बोराचा प्रियकर आणि इंद्राणी मुखर्जीचा मुलगा राहुल मुखर्जी मागील आठवड्यात साक्ष देण्याकरिता सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात येणार होता मात्र कोरोना ची लागण झाल्याने न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही त्यावेळेस राहुल मुखर्जी याने वकिलामार्फत न्यायालयात अर्ज केला आणि पुढील तारीख न्यायालयाकडून मागून घेतल्यानंतर 27 मे रोजी राहुल मुखर्जी सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात साक्ष देण्याकरिता येणार आहे. या प्रकरणातील राहुल मुखर्जी हा मुख्य साक्षीदार असल्याचे देखील बोलण्यात येत आहे.
तपासानुसार, शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद होती. इंद्राणी मुखर्जी यांचा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने 6 वेळा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना आज न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला आहे.