मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. परमबीर सिंग यांची या पदावरून उचलबांगडी करून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
हेमंत नगराळे यांची कारकिर्द
- हेमंत नगराळे हे महाराष्ट्र केडरच्या 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
- 1989 ते 1992 दरम्यान ते चंद्रपुरातील राजुरामध्ये एएसपी म्हणून पहिली पोस्टींग त्यांना मिळाली होती.
- 1992 ते 1994 दरम्यान सोलापूरमध्ये उपायुक्त म्हणून ते कार्यरत राहिले.
- बाबरी विध्वंसानंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांचे चांगले कौतुक झाले होते.
- 1994 ते 1996 दरम्यान रत्नागिरीत ते पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी दाभोळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे प्रकरण हाताळले.
- 1996 ते 1998 दरम्यान ते सीआयडी गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
- अंजनाबाई गावित बालक अपहरण आणि हत्या प्रकरणाचा गुंता सोडविण्यात नगराळेंची महत्वाची भूमिका राहिली.
- 1998 ते 2002 दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये सेवा दिली. यादरम्यान अनेक महत्वाची प्रकरणे त्यांनी हाताळली. केतन पारेख घोटाळा, माधौपुरा सहकारी बँक घोटाळा, हर्षद मेहता घोटाळ्याची प्रकरणे त्यांनी हाताळली.
- 2007 ते 2008 दरम्यान मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त(पूर्व) म्हणून त्यांनी काम पाहिले.
- 2008 ते 2010 दरम्यान एमएसईडीसीएलच्या दक्षता आणि सुरक्षा विभागात विशेष महासंचालक आणि संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
- 2014 मध्ये काही काळ त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला.
- 2016 ते 2018 दरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ते नियुक्त होते.
- 2018 नंतर त्यांची महासंचालक पदी बढती झाली. फॉरेन्सिक प्रयोगशाळेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
- चंद्रपूरच्या भद्रावतीतील जिल्हा परिषद शाळेतून त्यानी सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूरमधील पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. नागपूरच्या व्हीआरसीईमधून अभियांत्रिकीची पदवी त्यांनी घेतली. तर मुंबईतील जेबीआयएमएसमधून वित्त व्यवस्थापनात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली.
- पोलीस दलात कार्य करताना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त