मुंबई - शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आमदार रमेश लटके यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाईल अशा शक्यता वर्तवल्या जात आहे. तर, त्यांच्याविरुद्ध भाजपकडून मुर्जी पटेल यांना उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा आहेत. या सर्व निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र अंधेरीची जनता तहानल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वच्या शांतीनगर भागात मागच्या महिनाभरापासून अधिक काळ पाणीच येत नाहीये. इथली जनता तहानलेली असल्याचं चित्र आहे.
जनता त्रस्त नेते व्यस्त - सध्या इथल्या पाण्याच्या परिस्थितीबाबत आम्ही शांतीनगरच्या नागरिकांशी संवाद साधला असता त्या लोकांचं म्हणणं आहे की, "जून महिन्यापासून आम्हाला पाण्याची समस्या आहे. सुरुवातीला व्यवस्थित पाणी येत होतं. मात्र, आता आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. टॅंकर येतो त्यालासुद्धा वेळ नाही त्याच पाणी पुरत नाही. आम्ही इथल्या पालिका अधिकाऱ्यांशी भेटलो त्यांना आमच्या समस्या सांगितली पत्रव्यवहार केला. इथल्या लोकप्रतिनिधींशी भेटलो त्यांच्याशी आमच्या समस्या मांडल्या. मात्र, कुणालाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. रमेश लटके होते तेव्हा एक काळ होता आम्हाला पाण्यासाठी कधीही वणवण भटकावं लागलं नाही. मात्र, आता आम्हाला पाणी पाणी करावे लागतय." अशा प्रतिक्रिया इथल्या स्थानिक नागरिकांनी दिले आहेत.
महिलांची ओढाताण - शांतीनगर या भागाची लोकसंख्या साधारण सहा ते साडेसहा हजार आहे. जवळ-जवळ असलेली घर, अरुंद रस्ते असा हा परिसर आहे. महानगरपालिकेच्या पाण्याची पाईपलाईन आहे. मात्र, त्यात पाणीच येत नसल्याने इथल्या नागरिकांना पाहण्यासाठी भटकावे लागते. एकीकडे मुलांचे शाळा, घरच काम आणि त्यात पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या सगळ्यामुळे इथल्या महिलांची खूपच ओढाताण होत असल्याची प्रतिक्रिया या महिलांची बोलताना दिली आहे.