मुंबई - नवरात्रीत महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंबंधी राज्य सरकारने पश्चिम रेल्वेकडे मागणी केली होती. घटस्थापनेच्या दिवशी महिलांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याचे जाहीर देखील करण्यात आले. मात्र ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने मंजूरी न दिल्याने हा प्रस्ताव बारगळा. मागील दोन दिवस या प्रकरणावर राज्य सरकारमधील नेत्यांनी केंद्राकडे बोट दाखवत रेल्वे मंत्र्यांना लक्ष्य केले. अखेर या प्रकरणावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्र सरकारने 16 ऑक्टोबरला महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 आणि सायंकाळी 7.00 ते रात्री 12.00 पर्यंत ही सेवा देण्यात यावी, अशी मागणी यातून करण्यात आली होती. यावर आम्ही पुन्हा पत्र लिहून प्रवाशांच्या मुल्यांकनाबाबत तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत विचारणा केली. तसेच या विषयावर एकत्रिक निर्णय देण्याची मागणी केली, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
आम्ही कालही राज्य सरकारला विचारणा केली. सुविधा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. पश्चिम रेल्वेने अधिकची कुमक करून एकूण 700 रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. यामध्ये दोन महिला विशेष गाड्या देखील आहेत. मध्य रेल्वेने देखील पुढाकार घेत 706 गाड्या तयार ठेवल्या आहेत. मात्र राज्य सरकारने अद्याप याबाबात कोणताही अंतिम निर्णय दिला नसल्याचे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.