मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे व बडतर्फ पोलिस शिपाई विनायक शिंदे हे दोघेही हिरेन मनसुख याच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयामध्ये दिलेली आहे. याबरोबरच राष्ट्रीय तपास यंत्रणा हिरेन मनसुख यांच्या हत्येच्या संदर्भात लवकरच खुलासा करणार असल्याचंही न्यायालयामध्ये सांगण्यात आलेले आहे.
विनायक शिंदे व नरेश गोरच्या वकिलांनी केला हा दावा..
अटक आरोपी विनायक शिंदे यांचे वकील गौतम जैन यांनी युक्तिवाद करताना न्यायालयात म्हटलं होतं, की विनायक शिंदे वर फक्त सिमकार्ड डिलिव्हर करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटलं होत. याबरोबरच या प्रकरणातील क्रिकेट बुकी नरेश गोरचे वकील डायमंडवाले यांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे, की नरेश गोर याने फक्त बनावट सिम कार्ड गुजरात मधून मिळवून ते देण्याचं काम केले आहे. याबरोबरच या प्रकरणामध्ये नरेश गोर यास नाहक अडकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विनायक शिंदेच्या घरातून मिळाली डायरी..
एनआयएच्या माहितीनुसार विनायक शिंदे याच्या घरामधून त्यांना डायरी मिळाली असून या डायरीमध्ये 30 बार व क्लबच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या डायरीमध्ये बार व क्लबबद्दलची विस्तृत माहिती व ठरविण्यात आलेल्या रकमेचा उल्लेख करण्यात आल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले आहे. यातील बहुतांशी बार हे ठाणे-नवी मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे. सचिन वाझे हा विनायक शिंदे ला या संदर्भात काही रक्कम कमिशनच्या बदल्या देत असल्याचेही तपासात समोर आलेले आहे. 2020 मध्ये कोरोना संक्रमणाच्या कारणामुळे पॅरोलवर सुटून बाहेर आलेला विनायक शिंदे हा सचिन वाझें याच्यासाठी गेले वर्षभर काम करत होता.
दरम्यान, मुंबई पोलिस खात्यातील क्राइम ब्रांच मध्ये प्रमुख पदावर असलेल्या सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर त्याच पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या नंतर क्राईम इंटेलिजन्स युनिट (CIU) चा कार्यभार मधुकर काथे या पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा : लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध; राज्य सरकारची नवी नियमावली दोन दिवसांत