मुंबई - राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्यांमध्ये कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर आज ३ वाजता मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केल्याची माहिती मिळत आहे.
उद्योगपतींना सहकार्याचे आवाहन -
राज्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढू लागला आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. आता मुंबईतील रुग्णवाढ लक्षात घेता, लॉकडाऊन लागण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनला सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे. राज्यातील अनेक तज्ज्ञांकडून मुख्यमंत्री ठाकरे पर्याय सुचविण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अनुषंगाने अनेकांच्या बैठका घेत आहेत. तसेच लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यास उद्योगपतींकडून सहकार्याची मागणी करत कुणाचाही रोजगार काढू नका, अशी विनंती देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांकडे केली आहे. तसेच आज राज्यातील सिनेसृष्टीतील प्रमुख लोकांशी देखील आज दुपारी मुख्यमंत्री चर्चा केली आहे.
फडणवीसांकडून रश्मी ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस -
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फोनवरून रश्मी ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी राज्यातील सध्याच्या परिस्थितीचे अनुसरून सरकार जे निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षनेते म्हणून आपला समर्थन द्यावे, अशी मुख्यमंत्री विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देत राज्य जनतेच्या हितासाठी जो काही निर्णय घेईल, त्याला विरोधीपक्ष नेते तथा भारतीय जनता पार्टीचा सर्व सहकार्य असेल असे आश्वासन फडणवीस यांनी फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचे समजते.