मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. मात्र याबाबत माध्यमांनी संजय राऊत यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता, ईडीची नोटीस अद्याप आमच्यापर्यंत पोहोचली नाही. जेव्हा ईडीची नोटीस मिळेल तेव्हा तुम्हाला सांगू अशी प्रतिक्रिया संजय राऊत यंनी दिली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने आज नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी (29) रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. मात्र ईडीची कोणतीही नोटीस आम्हाला मिळाली नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना नोटीस
या अगोदर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र आता खुद्द संजय राऊत यांच्याच घरी ईडीची नोटीस आल्याने ते काय भूमिका घेण्यार? हे पाहाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.