मुंबई - महालक्ष्मी येथील प्रसिद्ध धोबीघाट येथे 1994 पासून कार्यरत असलेल्या धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाच्या निमित्ताने काढले आहे. त्यामुळे त्या विरोधात स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबा राहिल, असे भाजपा नेते व आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.
धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नूतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम दिले आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी धोबी घाटात जाऊन पाहणी केली. व स्थानिकांशी संवाद साधला, यावेळी स्थानिकांनी म्हणणे मांडले. ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था दर वाढवणार आहे. तसेच शौचालयाचे काम पूर्ण झाले. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर शौचालयाचे लोकार्पण कार्यक्रम झाला. पण, शौचालय खुले केले नाही. दर काय असतील हे सांगितले जात नाही. त्यामुळे स्थानिक आंदोलन करणार असल्याचे स्थानिकांनी आशिष शेलारला सांगितले.