मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम २४ ते २७ मे २०२२ या चार दिवसांत केले जाणार आहे. या कालावधीत मुंबईत ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चार दिवस पाणी कपात : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम २४ ते २७ मे २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळी ११.०० वाजेपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत एकूण ४ तासांकरिता हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर कालावधीमध्ये पिसे पांजरापूर संकुल येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सदर कामामुळे ‘ए’, ‘बी’, ‘ई’, ‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’, ‘एल’, ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’, ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ विभागात काही परिसरांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सदर कालावधीत म्हणजेच मंगळवार, दिनांक २४ मे २०२२ ते शुक्रवार, दिनांक २७ मे २०२२ या कालावधीत दररोज सकाळी ११.०० वाजेपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४ तासांकरिता नमूद केलेल्या विभागात ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सूचना : संबंधित परिसरातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा : Mumbai Water Reduction : पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल, प्रशासकांनी तोडगा काढावा - रवी राजा