मुंबई - एकीकडे मध्य रेल्वे मार्गावरील गेल्या दोन वर्षापासून लिंबू सरबतवर बंदी आहे, तर आता दुसरीकडे थंड पाणी पिण्यासाठी आयआरसीटीसीने उपलब्ध करून देणाऱ्या वॉटर वेंडिंग ( Water Wending Machine ) मशीन बंद झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना थंडगार पिण्याच्या ( Train Passengers Cold Water Shortage ) पाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर वणवण फिरावं लागत आहे.
वॉटर वेडिंग मशीन स्थानकातून होणार हद्दपार - रेल्वे प्रवाशांची तहान भागवावी म्हणून,आयआरसीटीसीने दोन वर्षांपूर्वी उपनगरी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या आहे. यावॉटर वेंडिंग मशीन मार्फत प्रवाशांना शुद्ध पाणी एक-दोन रुपयांत मिळत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे स्थानकांवरील बसविण्यात आलेल्या वॉटर वेंडिंग मशीन बंद असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांना आज थंड पाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर वणवण फिरावे लागत आहे. मध्य रेल्वे ५५ स्थानकांवर एकूण ८१ वॉटर वेंडिंग मशीन होत्या. ज्यामध्ये ‘जनजल’ 41 तर ‘फॉन्टस ४० असे ८१ मशीनी मध्य रेल्वेवर आज धूळ खात आहे. आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, वॉटर वेंडिंग मशीन चालविणाऱ्या खासगी कंपनीच्या कंत्राट संपला आहे. त्यामुळे या मशिनी सध्या बंद आहे. लवकरच या वॉटर वेंडिंग मशीन स्थानकांवरून हटविण्यात येणार आहे.
पाणपोईची सुद्धा अवस्था बिकट - प्रवाशांची तहान भागवावी म्हणून मध्य रेल्वेने प्रत्येक स्थानकावर पाणपोई उपलब्ध केल्या आहेत. सध्या आज सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटी, माटुंगा, मुलुंड, काजूरमार्ग आणि विद्याविहार सारख्या अनेक रेल्वे स्थानकावर पाणपोईची संख्या कमी असल्याने प्रवाशांना एक फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर पाणी पिण्यासाठी प्रवाशांना द्रविड प्राणायाम करावे लागत आहे. ऐन गर्मीच्या दिवसात प्रवाशांना थंड पाणी पिण्यासाठी रेल्वे स्थानकावर स्टॉलवरून खासगी कंपनीचे किंवा आयआरसीटीचे रेलनीर पॅक बंद बॉटलचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी रेल्वेच्या कारभार नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच रेल्वेनी लवकर बंद असलेल्या वॉटर वेंडिंग मशीन सुरु करा अथवा पाणपोईची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
काय म्हणाले प्रवासी - उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याची तीव्रता सतत वाढतच असल्याने साहजिकच रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची जास्त गरज भासते. मात्र, आज मध्य रेल्वे मार्गावरील गेल्या दोन वर्षांपासून वॉटर वेडिंग मशीन बंद आहे. त्याच बरोबर लिंबू सरबतांवरही बंदी घातली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव स्थानकाबाहेर स्टॉलवरून पाणी खरेदी करून तहाण भागवावी लागते. माझी रेल्वेला मागणी आहे की, वॉटर वेडिंग मशीन लवकरात लवकर सुरु करावीत. तर प्रवासी प्रभाकर थोरात यांनी सांगितले की, पूर्वी पाणपोयी, वाॅटर व्हेडिग मशीनद्वारे थंड पाण्याची सुविधा पुरविली जात होती. पाणपोयीवरून मोफत पाणी मिळत होते. तर, मशीनद्वारे अत्यल्प दरात थंडगार पाणी मिळत होते. मात्र, या दोन्ही सुविधांचा रेल्वे स्थानकावर अभाव दिसून येत आहे. त्यामुळे आज थंडगार पाण्यासाठी प्रवाशांना स्थानकांवर वणवण फिरावे लागत आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..'