मुंबई - मेट्रोच्या कामामुळे सतत पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याचे प्रकार घडत आहेत. आता पुन्हा एकदा मेट्रोच्या कामामुळे जोगेश्वरी जेवीएलआर मार्गावरील पाईपलाईन फुटली आहे. गेल्या दोन दिवसात या पाईपलाईनची दुरुस्ती न झाल्याने अंधेरी, जोगेश्वरी या विभागातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले आहेत. या विभागातील नागरिकांना पालिकेकडून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
जोगेश्वरी, जेव्हीएलआर मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या रस्त्याखालून 1800 मिलिमीटर व्यासाची मोठी पाण्याची पाईपलाईन आहे. या पाईपलाईनमधून अंधेरी आणि जोगेश्वरी या विभागांना पाणीपूरवठा केला जातो. मेट्रोचे काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याने येथील पाणी कमी दाबाने सोडले जाते आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम महापालिका प्रशासनातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. दुरुस्तीचे काम शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवसभर सुरू राहण्याची शक्यता आहे. या कारणाने अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच वांद्रे पश्चिम, कलिना आणि नेहरू रोड आदी परिसराला पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे.
दरम्यान, २ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल प्रशासन दिलगीर असून रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, पाणीपुरवठा बंद असलेल्या विभागातील नागरिकांना पालिकेकडून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- संपर्क क्रमांक
भाभा हॉस्पिटल - 9930260907, - वाकोला गावदेवी टनेल - 9930260532,
- सहाय्यक अभियंता पाणी पुरवठा अंधेरी पूर्व विभाग - 9930260429,
- दुय्यम अभियंता (पाणी पुरवठा) सांताक्रूझ पश्चिम विभाग - 9930260590,
- सहाय्यक अभियंता पाणी पुरवठा विभाग - सांताक्रूझ पूर्व विभाग - 9930260426.: