मुंबई - राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज पुन्हा राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, पुढील काही तासांत या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
हेही वाचा - भांडुप पोलिसांनी दुचाकीचोराला केली अटक; 10 गाड्या केल्या जप्त
पुढच्या 4, 5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्यावेळी घराबाहेर पडू नका, त्यात जिवाला धोका असू शकतो. शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपारनंतर, संध्याकाळी व रात्रीपर्यंत असते, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राला इशारा देण्यात आला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात निर्माण झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा पूर्वेकडे सरकरण्याची शक्यता आहे. तसेच, बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
हेही वाचा - Drugs Party Case : आर्यन खानसह तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी