मुंबई - पायी वारीच्या मागणीसाठी आचार्य तुषार भोसले यांच्यासह वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. यावेळी राज्यपालांनी याप्रकरणात थेट हस्तक्षेप करत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना फोन करुन सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा अशा सूचना देत या शिष्टमंडळाची मुख्य सचिवांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रधान सचिव असीम गुप्ता देखील उपस्थित होते. या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेचा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल आणि मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील असे मुख्य सचिवांनी सांगितले.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसगाड्यांनी नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्वीकारला असला, तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. त्यामुळे पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका, अशी मागणी वारकर्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन २१ जून या दिवशी राज्यपालांना देण्यात आले.
महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजाम, मोगल आणि इंग्रज यांच्या काळातही खंडित झाली नाही, तिला सलग दुसर्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह ५० वारकर्यांना पायी वारीला अनुमती द्यावी. आमच्या पालख्यांसह ५० वारकर्यांना सुरक्षा देणे सरकारला जमत नसेल, तर त्यांनी केंद्रशासनाकडून सुरक्षा मागवावी अशी प्रतिक्रिया भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी माध्यमांना दिली.