मुंबई - तंत्रज्ञानात झालेला बदल मानवाच्या पथ्यावर पडत आहे. दूर राहणाऱ्या माणसांना एकाच वेळी दृश्य माध्यमातून एकत्र येण्यास यामुळे मदत झाली आहे. याचाच उपयोग लॉकडाऊन आणि कोरोना काळात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी होणार आहे. व्हिडीओ अॅपच्या माध्यमातून भाऊ-बहीण एकत्र येणार आहेत. ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमधून पाहूयात यंदाचा रक्षाबंधन कसा साजरा होणार आहे.
आज (सोमवार) भाऊ-बहिणीमधील नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन आहे. यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. दूर राहणारे भाऊ-बहीण हा सण साजरा करण्यासाठी एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यामुळे राखी बांधण्यासाठी यंदा ऑनलाइन माध्यमांचा वापर बहिणी करणार आहेत. टाळेबंदीमुळे अनेक सण लोकांनी साधेपणाने साजरे केले आहेत. त्यानुसार यंदाचा रक्षाबंधन साजरा होणार आहे. भावांना राखी बांधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंगचा वापर होणार आहे. ऑनलाइन राखीचीही मागणी वाढलेली आहे.
हेही वाचा - 'महिलांचा सन्मान राखणारा शिवरायांचा महाराष्ट्र हे मुख्यमंत्र्यांनी कृतीतून दाखविण्याची वेळ'
आम्ही घरी राहूनच हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडीओ ऍपद्वारे ऑनलाइन शिक्षण शिकवले जाते, हे आम्ही पाहतो. तसा रक्षाबंधनही साजरा करता येऊ शकतो. यामुळे आम्ही ऑनलाईनचा मार्ग निवडला आहे. कारण भाऊ लांब राहत आहे. तेव्हा, सोशल अंतर राखत, रक्षाबंधन करण्याचे आम्ही ठरवले आहे, असे प्रज्ञा गायकवाड यांनी सांगितले.
माझा भाऊ दापोलीला राहत असल्यामुळे यंदा मला त्याच्याकडे जाता येणार नाही आहे. यामुळे आम्हाला दरवर्षी प्रमाणे भेटता येणार नाही. यावर उपाय म्हणून व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून आमची भेट होणार आहे. मी लोकांना आवाहन करते की, सोशल अंतर राखूनच रक्षाबंधन साजरा करा. अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही आहे, असे श्वेता माने यांनी सांगितले.
राख्यांची ऑनलाईन विक्री...
गेल्यावर्षी पेक्षा यावेळी ऑनलाईन राख्यांची मागणी वाढलेली आहे. कारण लोकांना घरपोच राखी सेवा हवी आहे. यंदा मी बनवलेल्या राख्या संपल्या आहेत. समाज माध्यमांचा वापर करून राख्यांची विक्री केली आहे. ऑनलाइन हे माध्यम खूप उपयोगी आहे. सध्याचा रक्षाबंधन हा याच माध्यमांवर मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. आतापर्यंत कोकण, नवी मुंबई, रायगड या भागात राख्या पाठवलेल्या आहेत, असे ऑनलाईन राखी विक्रेते दर्शना गोवेकर यांनी सांगितले.