मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फटका कुणाला बसणार हे आज स्पष्ट होणार आहे.
प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम सोबत युती करुन दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत रंगत आली होती. पण ही आघाडी किती जागा जिंकते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी अजूनपर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली नाही. मात्र, तरीही निवडणुकीत त्यांच्या आघाडीचे नक्की काय होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. स्वतः आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी ४८ जागा जिंकेल, असा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात वंचित नक्की किती जागा जिंकेल किंवा कोणाच्या विजयाचा वारू रोखेल हे आज स्पष्ट होईल.
काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला भाजपची 'बी टीम' असे संबोधले असले तरीही २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने दोन्ही प्रमुख आघाड्यांसमोर मोठे आव्हान उभे केले होते त्यामुळे निकालात याचा प्रभाव कितपत जाणवणार याची धाकधूक या दोन्ही विरोधकांच्या गोटात आहे.