मुंबई - मुंबईत लसीचा तुटवडा असल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मुंबईत तौत्के वादळ धडकणार आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील लसीकरण उद्या सोमवारीही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. तसेच पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडे पूर्ण झाल्यावरच कोव्हिशील्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
उद्या लसीकरण बंद -
पश्चिम किनारपट्टीवरून तौत्के वादळ मार्गक्रमण करत आहे. हे वादळ मुंबईच्या किनारपट्टीवरून आज रात्री किंवा उद्या सकाळी गुजरातकडे जाणार आहे. या दरम्यान मुंबईत ६० ते ७० किलोमीटर वेगाने ताशी वारे वाहण्याचे तसेच पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उद्या सोमवारी (१७ मे) होणारे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले असले तरी ६० असे वर्षावरील नागरिकांना वॉक इन पद्धतीने मंगळवार ते गुरुवार लसीकरण केले जाईल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनाच दुसरा डोस -
केंद्र सरकारने नुकतेच लसीकरणाबाबत नियमात बदल केला आहे. पहिल्या डोस घेतल्यावर दुसरा डोस घेताना १२ ते १६ आठवड्याचे अंतर असावे असे बदल केले आहेत. १ मार्चपासून जेष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात असल्याने त्यांना दुसरा डोस नव्या नियमानुसार देता येणार नाही. त्यामुळे मुंबईत फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांनाच लसीचा दुसरा डोस दिला जाणार नाही. १८ ते २० मे दरम्यान ६० वर्षावरील नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.