मुंबई - कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
'विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम' -
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. तसेच या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल, याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
महाविद्यालयांना केल्या सुचना -
ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी ही सामाजिक अंतर राखून, मास्क लाऊनच वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन-ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे, याची पाहणी त्यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
अशी असेल नियमावली -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. दुसरी लाट आटोक्यात असल्याने शाळा, मंदिरे, सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी शाळा सुरू करण्याबाबत असलेल्या नियमावलीप्रमाणेच नियमावली असणार आहे. महाविद्यालयात येणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे दोन डोस सक्तीचे असणार आहेत. महाविद्यालयात सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे लागणार आहे, मास्कचा वापर सक्तीचा असणार आहे. त्याच बरोबर महाविद्यालये वेळोवेळी सॅनिटाइज करावी लागणार आहेत अशी माहिती काकाणी यांनी दिली.
95 टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांना पहिला डोस -
शिक्षक आणि विद्यार्थी यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. त्यामाध्यमातून दोन दिवस लसीकरण करण्यात आले. सुमारे 95 टक्के शिक्षक आणि विदयार्थी यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र वाढवली जातील. येत्या दोन दिवसात लसीकरण केंद्र वाढवली जाणार आहेत. ज्या ठिकाणी बाजूबाजूला 10 ते 20 सोसायट्या असतील अशा ठिकाणीही लसीकरण केंद्र सुरू केले जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु -
राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे. कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा आणि महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात यावी असे निर्देश देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
काय असेल नियमावलीत -
- शिक्षक विद्यार्थी यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत
- ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच महाविद्यालयात प्रवेश इतर विद्यार्थी ऑनलाईन सहभागी होऊ शकतात.
- एका बेंचवर एक विद्यार्थी
- झिग झ्याग पद्धतीने विद्यार्थी वर्गात बसतील
- वर्ग आणि महाविद्यालयाचा परिसर दिवसातुन तीन वेळा स्वच्छ करावा
- जवळच्या आरोग्य केंद्राला महाविद्यालयाल संलग्न करावे लागणार