मुंबई : प्रदुषण कमी करण्यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ऑटोकार इंडियाच्या वतीने मुंबईत आयोजित 'ग्रीन मुंबई ड्राइव्ह २०२१' या इलेक्ट्रिक कार रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईला स्वच्छ आणि हरीत पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने मुंबईत 'ग्रीन मुंबई ड्राइव्ह २०२१' या इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.
महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटा, टेस्ला, वोल्वो, ऑडी, जग्वार, मर्सिडीज, एमजी, ह्युंडाई अशा विविध कंपन्यांची सुमारे ३० वाहने सहभागी झाली होती. अदानी इलेक्ट्रिसिटी या रॅलीचे प्रायोजक होते.
हेही वाचा - पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन