मुंबई - उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला राम राम केल्यावर त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. उर्मिला मार्तोंडकर यांचे मराठी अभिनेत्री म्हणून मातोश्रीशी चांगले संबंध आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही उर्मिला मातोंडकर यांनी भाजपवर कडाडून टिका केली होती. मात्र, ठाकरे कुटुंबाशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टीका केली नाही. मातोश्रीनेही उर्मिला मातोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते.
काही दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावर मिलिंद नार्वेकर यांच्याकडे विचारणा केली असता, ही चर्चा राजकीय नसून ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे चर्चा झाली असल्याचा खुलासा नार्वेकर यांनी केला आहे. या भेटीला कुणीही राजकीय रंग देऊ नये अशी विनंती त्यांनी केली. मात्र, काँग्रेस सोडल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर भगवा झेंडा खांद्यावर घेणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.