मुंबई : आझाद मैदानावर गेल्या 11 दिवसांपासून राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे शेकडो शिक्षक बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहे. मात्र प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने सोमवारी एका शिक्षकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलक शिक्षकांमध्ये शासनाविरोधात तीव्र संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी लॉकडाऊन काळात शासनाकडून अशीच दिरंगाई केली जात होती, ज्यादरम्यान 27 विनाअनुदानित शिक्षकांचा मृत्यू झाला. यांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने तसेच, आत्महत्या करून मृत्यू झालेल्या शिक्षकांचा समावेश आहे.
काय आहेत मागण्या..
गेल्या 20 वर्षांपासुन होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांची हेळसांड थांबविण्यासाठी 13 सप्टेंबर 2019 नुसार घोषित अनुदान मजुर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजचा 20 टक्के व टप्पा वाढ शाळांचा 40 टक्केचा निधी वितरणाचा आदेश सभागृहात वारंवार आश्वासित केला आहे. तरीसुध्दा यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मागील वर्षात 24 मार्च 2020ला अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी पुरवणी मंजुर केली, त्यानंतर कोरोनामुळे निधी वितरण करण्यात आलेला नाही.
शासनाचा वेळकाढूपणा..
गेल्या पंधरा दिवसापासून विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आपल्या मागण्यांकरिता बेमुदत धरणे आणि अमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. याची दखल घेत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाला बोलवले होते. विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर शासनाने आणखी पंधरा दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे शासनाचा या वेळकाढूपणामुळे असल्याने शिक्षक आंदोलकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मंत्रालयासमोर आंदोलन करू..
जालना जिल्ह्याचे शिक्षक ज्ञानेश्वर हरिभाऊ चव्हाण यांची आज (सोमवार) प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्ञानेश्वर हे आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासून आझाद मैदानावर इतर शिक्षकांबरोबर हजर होते. सोमवारी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे आझाद मैदानामधील सर्व आंदोलक शिक्षकांमध्ये शासनाविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर यांच्या जीवितास काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, आणि आम्ही सर्व शिक्षक मंत्रालयासमोर आंदोलनाला बसू असा इशारा शिक्षक समन्वय संघाच्या नेहा गवळी यांनी शासनाला दिला आहे.
हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'त्या' ट्विट्सची चौकशी होणार - गृहमंत्री अनिल देशमुख