मुंबई- मागील काही आठवड्यांपासून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी सर्व्हर डाऊन आणि त्यासोबतच सर्व्हर हॅकमुळे मुंबई विद्यापीठ अडचणीत सापडले होते. दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) या परीक्षेसाठी आता तोडगा काढला आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील अडचणी लक्षात घेऊन परीक्षेपूर्वी ऑनलाईन सराव परीक्षा सुरू केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमच्या परीक्षा सोमवारी २६ ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयडॉलकडून ऑनलाईन सराव परीक्षा (Mock test ) सुरु करण्यात आल्या आहेत. या सराव परीक्षांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विनोद माळाळे यांनी दिली.
या सराव परीक्षेसाठी अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांना ईमेलवर सराव परीक्षेची लिंक मिळाली असून जे अजूनपर्यंत सराव परीक्षेस बसले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर व आयडॉलच्या लिंकवर टाकण्यात आली आहे. त्यांच्यासाठी शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत परत सराव परीक्षा घेण्यात येईल. तरी विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिलेली नाही, त्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकली आहे. विद्यार्थ्यांनी या यादीत नाव पाहून संकेतस्थळावर दिलेल्या १० हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना सराव परीक्षा देण्यास अडचण येणार नाही.