मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी आदर्श म्हाडा वसाहत म्हणून विक्रोळीतील कन्ननमावर नगराची ओळख आहे. नगरातील इमारती आता जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास अडथळ्याविना जलद गतीने व्हावा, यासाठी विक्रोळीतील रहिवासी आणि सजावटकार दर्शना गोवेकर यांनी देखावा उभारला आहे. कन्नमवार नगरच्या इमारतींचा विकास जलदगतीने होउ दे, असे साकडे त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून गणरायाला घातले आहे. या देखाव्याची चर्चा सध्या विक्रोळी भागात होत आहे. लवकरच नवीन घरात जाऊ दे, स्वप्न पूर्ण होऊ दे महाराजा असे गाऱ्हाणे घातले जात आहे.
कन्नमवार नगर या म्हाडा वसाहतीतील पुनवर्सनाचा प्रश्न मोठा आहे. येथे 250 पेक्षा जास्त इमारती आहेत. अनेक इमारतींची अवस्था वाईट आहे. घराघरांत छत कोसळणाच्या घटना घडत आहे. काही इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. मात्र तो धीम्या गतीने सुरू आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे. सर्वच इमारतींचा पुनर्विकास लवकर होऊ दे, मराठी टक्का टिकू दे, यासाठी विक्रोळी येथे राहणाऱ्या दर्शना गोवेकर यांनी त्यांच्या घरी 'पुनर्विकास लवकर होऊ दे', महाराजा या थीमच्या आधारे देखावा साकारला आहे. पुनर्विकास लवकर होऊ दे रे महाराजा, विक्रोळी कोणी सोडून नको जाऊ दे देरे महाराजा, बिघडलेली नाती पूर्ववत होऊ दे रे महाराजा असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
लहानपणापासून आम्ही विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये राहतो. विक्रोळीमध्ये म्हाडाच्या इमारती आहेत. या इमारती आता जीर्ण अवस्थेत आहेत. लवकरात लवकर पुनर्विकास हवा आणि सर्वजण नवीन घरात जावे , यासाठी मी बाप्पाला देखाव्याच्या माध्यमातून प्रार्थना केली आहे. हा देखावा साकारण्यासाठी कापड, पाइप यांचा वापर केला आहे जेणेकरून या वस्तू पुन्हा वापरता येईल, असे गोवेकर यांनी सांगितले.