मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आपल्या एक महिन्याच्या वेतनातून राज्यातील आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात आंबेडकरी गायक कलावंतांची परिस्थिती हालाकीची झाली आहे. राज्यात अजून 15 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांना आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून आंबेडकरी कलावंतांना कोणतेही कार्यक्रम मिळालेले नाहीत.
गत वर्षी कोरोना रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीचे जाहीर कार्यक्रम करण्यात आले नाही. यंदाही नेमका 14 एप्रिल आंबेडकर जयंतीपासून राज्यात लॉकडाऊन लागला असल्याने आंबेडकरी कलावंतांना कार्यक्रम मिळालेले नाहीत. दोन्ही वर्षी आंबेडकरी कलावंतांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आंबेडकरी गायक कलावंतांना येत्या 1 मे रोजी प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत आठवले करणार आहेत. आठवले यांना महिन्याला 2 लाख रुपये वेतन मिळत असून एक महिन्याचे वेतनाचे 2 लाख रुपये त्यांनी आंबेडकरी कलावंतांना मदत म्हणून वाटणार आहेत.
ईटीव्ही भारतने देखील मांडला होता आंबेडकरी कलावंतांचा प्रश्न
महाराष्ट्रात, देशात याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारने आंबेडकर जयंती ही साधेपणाने साजरी करा, असे अनुयायांना आवाहन केले होते . मात्र, या सपूर्ण परिस्थितीचा फटका आंबेडकरी कलावंताना बसला आहे. अनेक कलाकार आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम करत असतात. कार्यक्रम 12 एप्रिलपासून सुरू होतात. जूनमध्ये पाऊस सुरू होईपर्यंत विविध ठिकाणी जयंती महोत्सव साजरा असतो. यामध्ये मिळणाऱ्या मानधनातून कलाकाराचे घरखर्च चालत असतात. मात्र, यंदा सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
संपूर्ण बातमी वाचा
https://react.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/babasaheb-ambedkar-follower-artists-raised-questions-about-livelihood/mh20210414042619558