मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. ओबीसींना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी मी केंद्र सरकारमध्ये प्रयत्न करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आठवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
ओबीसी आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा सदैव पाठिंबा राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची योग्य बाजू मांडली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्यात आले. त्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा विषय आपण मांडला होता. यापुढे ही ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारमध्ये प्रयत्नशील राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी कळविले आहे.