मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर हल्लाबोल केला जातो. आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत नारायण राणे हे मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करताना पाहायला मिळाले. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळले आहे.
हेही वाचा - मी तुम्हाला पुरून उरलो, आता चांगल्या शब्दांत टीका करणार - नारायण राणे
- आता मी चांगल्या शब्दात टीका करणार - राणे
24 ऑगस्टला नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केल्याने पोलिसांकडून राणे यांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर कोर्टाने त्यांना जामीनही मंजूर केला. त्यामुळे आज नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर ते तुटून पडतील असं वाटत असताना "आता मी चांगल्या शब्दात टीका करणार" असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख टाळला आहे.
- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख टाळला -
नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा आदरपूर्वक "महाशय" म्हणून उल्लेख केला. आता त्यानंतर 17 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीपर्यंत कोर्टाने शब्द जपून वापरण्यास सांगितले असल्याचे नारायण राणे म्हणाले. त्यामुळे 17 सप्टेंबरनंतर नारायण राणे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या शैलीत उत्तर देणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
- शब्दांचा जपून वापर करण्याच्या राणे यांना कोर्टाच्या सूचना -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाड कोर्टाने अटीशर्ती आणि पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शब्दांचा जपून वापर करावा, अशा सूचना कोर्टाने राणे यांना दिल्या आहेत.
हेही वाचा - Narayan Rane Case : नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा