मुंबई- देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र केंद्र सरकारकडून खरी आकडेवारी जाहीर केली जात नाही. आकडेवारीमध्ये लपवाछपवी सुरू आहे. असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आपल्या देशात लसीची अत्यंत गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस वाटायला काढली. विश्वगुरू बनण्याच्या नादात पंतप्रधानांचे देशाच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले. पंतप्रधानांकडून देशावर अन्याय झाला, असे म्हणत नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला आहे. देशातील ढासळणाऱ्या आरोग्य व्यवस्थेसाठी केंद्र सरकार जबाबदार असून, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
...तेव्हा पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात मग्न होते
देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री प्रचारात मग्न होते. त्यांनी सभा आणि रॅली सुरू ठेवल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने आधी 60 वर्षांवरील लोकांना लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यासंदर्भात घोषणा झाली आणि आता 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण केले जाईल अशी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. मात्र देशात लसींचा साठा कमी प्रमाणात असल्याने लसीकरण होईल का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच मोफत लसीकरणाचा सर्व बोजा राज्य सरकारवर पडणार असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. 4 लाख 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोठा राज्यासाठी घोषित करण्यात आला होता. मात्र अजून दोन लाख दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनं राज्याला मिळाली नाहीत. हा केंद्राकडून महाराष्ट्रावर सुरू असलेला अन्यायच आहे, अशी टीका मलिक यांनी केली आहे.