मुंबई - मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका असे म्हटले आहे. मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसारादरम्यान गेल्या दीड वर्षात ८४ हजार ३६४ अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आल्या आहेत. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पालिका आयुक्तांनी आपले प्रशासनावर पकड असल्याचे सिद्ध करून दाखवावे. तसेच पालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरु असून हा भ्रष्टाचार पालिका आयुक्तांनी रोखून दाखवावा असे आव्हान पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले आहे.
सरकार सोबत कारवाई करून दाखवा -
नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील अनधिकृत बांधकामावर करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, कारवाई करा असे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुंबईमध्ये गेल्या दीड वर्षात ८४ हजार ३६४ अनधिकृत बांधकामे झाल्याची नोंद पालिककडे नोंद आहे. त्यापैकी ५ टक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने कोर्टाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नका असे म्हटले होते. आता कोर्टाने आपले आदेश मागे घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष तसेच पालिकेतील विरोधी पक्ष आपल्या सोबत असल्याने या अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करून दाखवावी असे आव्हान रवी राजा यांनी केले आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा -
आमच्याकडे अनेक अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येतात. त्या आम्ही कारवाईसाठी आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवतो. कारवाई न झाल्यास आयुक्तांची भेट घेतो. आयुक्त अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र अधिकारी आयुक्तांना चुकीची माहिती देतात. पालिकेतील काही अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. मात्र काही अधिकारी अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत आहेत. पालिकेच्या डी विभागामधून के वेस्ट विभागात व नंतर मालमत्ता विभागात बदली झालेले सहाय्य्क आयुक्त, येत्या तीन दिवसात निवृत्त होणारे उपायुक्त, डी विभागात कार्यरत असलेले काही अधिकारी असे अनेक अधिकाथ्यांची उदाहरणे आहेत. त्यांच्यावर पालिका आयुक्तांनी कारवाई करावी असे आवाहन रवी राजा यांनी केले. एखाद्या झोपडी धारकारने बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र मोठया इमारातींमध्ये जे बांधकाम होते त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असेही रवी राजा म्हणाले.
बदल्यांमध्ये भ्रष्टाचार -
पालिकेमध्ये अभियंत्यांच्या बदल्या या सिटी इंजिनियर किंवा संचालकांकडून केल्या जातात. या बदल्या करताना अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. पालिकेतील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. पालिकेच्या सिटी वर्क्स कमिटीमध्ये अभियंत्यांच्या पदोन्नतीचे काल रात्री प्रस्ताव आले. आज सकाळी ते प्रस्ताव मंजूर झाले. असे या पदोन्नतीमध्ये काय होते असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी