मुंबई - भाजप- शिवसेना युतीत घनिष्ट संबंध असल्याचे कार्यकर्त्यांना दर्शवण्यासाठी खटाटोप करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. शाह यांनी ठाकरे यांना काल दूरध्वनी वरून अहमदाबादला येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत ठाकरे यांनी अहमदाबादला जाण्याचे माण्य केले आहे. उद्या सकाळी ९ वाजता होणाऱ्या रोड- शोमध्येही ठाकरे सहभागी होतील.
महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवसेनेला जनाधार आहे, त्याचप्रकारे अहमदाबाद आणि सुरत सारख्या व्यापारी शहरात ही मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच गुजरातच्या मैदानात उतरवले आहे. ठाकरे यांच्यासह सेनेचे अन्य नेतेही उद्या अहमदाबादला जाणार आहेत. गेली ४ वर्षे भाजपवर शिवसेनेने टीका केली होती. मात्र राष्ट्रहिताच्या मुद्यावर भाजपसोबत युती करत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. मात्र भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलणाचा प्रश्न अबाधित आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यासाठी युतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.