नवी मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी व्यापक आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. हे आंदोलन आणखी कसे व्यापक होईल, यासंदर्भात नवी मुंबईत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिले आहेत.
छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत राज्यस्तरीय बैठक पार पडणार होती. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले दोन्ही राजे एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने सर्वांमध्ये उत्सुकता होती. मात्र, उदयनराजे या बैठकीला अनुपस्थित राहत असल्याने सर्वांचा हिरमोड झाला आहे. ही बैठक एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनात पार पडत आहे. यावेळी मराठा मोर्चाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्या संदर्भात माथाडी भवनमध्ये या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी मार्गदर्शन करत आहेत.