मुंबई - बुधवारी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काळा पाणी येथील नाथानी रेसिडेन्सी या इमारतीच्या लिफ्टमध्ये पाणी शिरल्याने तिथे अडकलेल्या 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आहे. जमीर अहमद सोहनन (32 ) व शेहजाद मोहम्मद सिद्दीकी मेमन (37) असे या दोन सुरक्षारक्षकांची नावे आहेत.
दरम्यान, बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने दोन्ही सुरक्षारक्षक हे इमारतीच्या लिफ्टमध्ये चढले. यावेळी लिफ्टचे दरवाजे बंद झाले. पण, लिफ्ट चालू झाली नाही. दोन्ही सुरक्षारक्षकांनी लिफ्टचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करूनही दरवाजा न उघडता आल्याने त्यांनी लिफ्टचा अलार्म वाजवला. यावेळी इमारतीच्या काही रहिवाशांनी बेसमेंटमध्ये जाऊन लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला, तरीही ते शक्य झाले नाही.
या दरम्यान, पाणी पूर्ण बेसमेंटमध्ये भरल्याने रहिवाशी लिफ्टमध्ये जाऊ शकले नाही. यानंतर इमारतीच्या राहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबद्दल माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन लिफ्टची वरील बाजू कापून काढून दोन्ही सुरक्षारक्षकांना बाहेर काढले. मात्र, या दरम्यान या दोन्ही सुरक्षारक्षकांचा या दरम्यान मृत्यू झाला होता. या संदर्भात आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.