नवी दिल्ली - सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकारांना बोलवले होते. पुण्याजवळ परंदरला विमानतळ होणार असून याबाबत राज्य सरकारने तयार केलेला प्रस्ताव आणि दिल्लीत केंद्र सरकारला दिलेल्या निवेदनाबाबतची माहिती देण्यासाठी पवारांनी ही पत्रकार परिषद बोलवली होती. मात्र पत्रकारांनी त्यांना शेतकरी आंदोलनाबाबतचे प्रश्न विचारत बोलते करण्याचा प्रयत्न केला.
मी लिहीलेल्या पत्राचा विपर्यास करण्यात आला
शरद पवारांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ''मी लिहीलेल्या पत्राचा विपर्यास करण्यात आला. ज्यांनी हे पत्र समोर आणले ते आणण्या आधी त्यात मी काय म्हटले होते ते निट वाचले असते तर त्यांनी नक्की समजले असते. विषय डायवर्ट करण्यासाठी हे पत्र समोर आणले गेले.''
एपीएमसी काही सुधारणा करण्याची गरज मी व्यक्त केली होती
प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार पुढे म्हणाले, ''एपीएमसी काही सुधारणा करण्याची गरज मी व्यक्त केली होती. एपीएमसी कायदा तसाच रहावा ही माझी भूमिका होती. मी पत्रात या बाबी लिहील्या होत्या. ते पत्र विरोधकांनी नीट वाचले पाहिजे. सध्याच्या सरकारने जे तीन कायदे केले आहेत त्यात कुठेही एपीएमसीचा उल्लेख नाही. त्यामुळे विरोधकांच्या राजकारणाला महत्व देण्याची गरज नाही.''
पवारांनीच केली होती शिफारस, फडणवीसांचा दावा
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे. यावर भाजप नेत्यांनी तीव्र आगपाखड केली असून शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच २०१० साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला होता.
हेही वाचा - कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा १३वा दिवस; आज भारत बंद! पाहा LIVE अपडेट्स..
हेही वाचा - LIVE : राज्यभरातील बंदला कसा मिळतोय प्रतिसाद; वाचा लाईव्ह अपडेट्स