मुंबई - कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, असा निर्णय आज कोकणातील आमदार खासदार आणि मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय जाहीर करतील अशी माहिती शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवासाठी सरकारने प्रवासासाठी तसेच क्वारंटाइन होण्यासंदर्भात विविध प्रकारची सूट देण्यात यावी, यासाठी कोकणातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांसह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज एक बैठक पार पडली. या बैठकीत कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकारच्या शिफारशींचे एक पत्र आणि त्यासाठीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या कोरोणाचे मोठे संकट आहे. परंतु कोकणात जाणाऱ्या लोकांना क्वारंटाइन होण्यासाठी व्यवस्था कमी आहे. त्यामुळे यंदा कमी प्रमाणात लोकांनी कोकणात जावे, असा विचार समोर आला. तर ज्यांची घर बंद आहेत, त्यांच्यासाठी काय नियोजन असेल, यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
बसेस व्यवस्था कशी करायची यावरून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या आंतरजिल्हा परिवहन वाहतुकीसाठी परवानगी नाहीय. भविष्यात परवानगी मिळाल्यास त्याबाबत व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच याबाबतचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. घरगुती गणपती कसा साजरा करायचा, या संदर्भात सरकार लवकरच नियमावली जाहीर करणार आहे.