मुंबई - एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले.
- ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा -
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. राहिलेल्या मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक आहे. यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार आहे.
- 'दिवाळी सणात सर्वसामान्याची गैरसोय टाळावी'
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असताना देखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. सध्या ८५ टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरीत १५ टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परिवहनमंत्री यांनी केले आहे.
- पाच हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई -
अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमूदत संप पुकारला होता. संपाच्या दुसऱ्यादिवशी राज्यातील 190 डेपो बंद झाल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी कृती समितीशी चर्चा केली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार शुक्रवारी एसटीची वाहतूक सुरुळीत सुरु होणे अपेक्षित होते. परंतु अहमदनगर, शेगाव डेपोमध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने कर्मचारी आक्रमक झाले. परिणामी राज्यातील काही एसटी आगारामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने आंदोलन सुरूच ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन त्वरित मागे न घेतल्यास, त्यांच्यावर एसटी महामंडळाच्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार बडतर्फपर्यंतची कारवाई करण्याचे निर्देश देणारे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. मात्र, या पत्राला न जुमानता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटीला कोट्यवधीचा फटका बसला आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा -
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ आक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले होते. तरीही काही आगारांमध्ये नियमबाह्य आंदोलन, संप, निर्देशने सुरू आहेत. याबाबत एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर अंतरिम आदेश देत असताना, औद्योगिक न्यायालयाने संबंधित आंदोलने, संप, निर्देशने बेकायदेशीर ठरवले असून प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. त्यानुसार, आता बेकायदेशीर संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने नोटीस बजावणे सुरु केले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - ST Worker Strike : बेकायदेशीर संप पुकारणाऱ्या ५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फची नोटीस