मुंबई - पावसाने रात्रीपासून मुंबईला झोडपले असून या मुसळधार पावसामुळे मुंबई पूर्व उपनगरातील सखल भागात पाणी साचलेले पहायला मिळाले. चेंबूर, कुर्लासहीत सायनमध्ये पाणी साचले असून सायन आणि चुन्नाभट्टी रेल्वेस्थानक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे लोकलवर याचा परिणाम झाला आहे.
मुंबई शहरसह पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक विभाग जलमय झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. कुर्ला एलबीएस, सायन रेल्वेस्थानक, चुनाभट्टी आदी ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले होते. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पाण्याचा निचरा झाल्याने नसल्याने रस्त्यांवर जैसे थे परिस्थितीत आहे. पालिकेकडून पंपाद्वारे पाणी काढण्याचे काम सुरू असून अनेक सखल भागात पालिका कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.