मुंबई- डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या पहिल्या टप्पा 15 ऑगस्ट सुरू होणार असून यावरून मालवाहतूक रेल्वे धावणार आहे. 9 राज्यातील 61 जिल्ह्यातून मार्गस्थ होणारा 3360 किमी लांब डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम वेस्टर्न आणि ईस्टर्न कॉरिडोर मध्ये केले जात आहे. 2021 पर्यंत फ्रेट कॉरिडोरचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ईस्टर्न कॉरिडोर खुर्जा ते बदानपर्यंत असून याच मार्गावर 15 ऑगस्टपर्यंत मालवाहतूक सुरू करण्यासाठी दिवस रात्र काम सुरू आहे.
भारतीय रेल्वेत सद्य स्थितीत एकाच ट्रॅकवर मालगाडी व पॅसेंजर गाडी चालवली जाते. एका गाडीमुळे अनेकदा दुसरी गाडी प्रभावित होते. मालगाडीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करणे हे या डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्दिष्ट आहे. यामुळे मालगाडीचा वेग ताशी 60 ते 75 किमी असणार आहे. यामुळे मालगाडीला लागणारा 4 दिवसांचा कालावधी कमी होऊन एक दिवस इतका होईल. यामुळे इतर पॅसेंजर गाड्यांची वारंवारता सुधारेल आणि मालवाहतूक गाड्यांना लागणारा अधिक वेळ कमी होईल.
पश्चिम डीएफसी अंतर्गत 48 आणि पूर्व डीएफसी अंतर्गत 58 स्थानक बांधण्यात येतील. पश्चिम डीएफसी नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते उत्तर प्रदेशच्या दादरी पर्यंत 1504 किमी अंतर असेल. तर पूर्व डीएफसी पंजाबच्या लुधियाना ते पश्चिम बंगालच्या दनकुनी पर्यंत 1856 किमी असेल. हा मार्ग हरियाणा,उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यातून जाणार आहे. या एकूण प्रकल्पाची किंमत 81, 459 कोटी रुपये इतकी आहे.