मुंबई - १ लाख लसीकरणाच्या टार्गेटसाठी सहा कोटी संबधित कंपनीत डिपॉझिट म्हणून देणं बंधनकारक असल्याने आरोपींनी बोगस लसीकरणाचा कँम्प सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी ३ जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या १३ वर पोहचली आहे. डॉ. मनीष त्रिपाठी, राहुल दुबे आणि राजेश पांडे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत मुंबईत ९ तर ठाण्यात 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास इथेच संपला असल्याची माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. या प्रकरणातनंतर मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या बोगस लसीकरणाची प्रकरणे समोर आली आहेत. तपासात आरोपींनी २५ मे ते ६ जून दरम्यान १० शिबिरांचे आयोजन केले गेले होते. या दरम्यान २६०० लोकांना बोगस लस देण्यात आल्या. यातील ७०० जणांना कोणती लस दिली हे स्पष्ट झालेलं नाही. तर इतर जणांना नॉर्मल सलाईन वॉटर देण्यात आले आहे, असं विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
या सर्व बोगस लसीकरणामागे शिवम हॉस्पिटलचा हात होता. या हॉस्पिटलमधून हा सर्व गैरप्रकार सुरू असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी हे रुग्णालय सील करण्यासंदर्भात पोलिसांनी पालिकेशी पत्र व्यवहार केला आहे. या आरोपींना 1 लाख लस विकत घेण्यासाठी ५ ते ६ कोटींची गरज होती. यासाठी त्यांनी बोगस शिबीरे आयोजित केली होती. मात्र टार्गेट पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी यापुर्वी गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींनी लसींचा पुरवठा करण्यासाठी वापरलेली क्रीम रंगाची टोयोटा कोराला ही कार जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातले मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंह आणि मनीष त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती नांगरे पाटील यांनी पत्रकारांना दिली.