भोपाळ - मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी बस काल (मंगळवार) कालव्यात कोसळली. या अपघातात आतापर्यंत 49 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. सतना शहराकडे जात असताना रामपूर नेकिन येथील पाटन पुलिया या ठिकाणी बस कालव्यात कोसळली होती.
सविस्तर वृत्त - मध्यप्रदेश बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 49वर, दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू
मुंबई - कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करत, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला समोर जावे लागेल, असेही ते म्हणाले.
सविस्तर वृत्त -नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊनला समोर जावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
चेन्नई - डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा सहावा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अक्षरने भन्नाट कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने ६० धावा देऊन पाच बळी घेतले. या सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत करत भारताने इंग्लंडविरुद्धचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला. यासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे.
सविस्तर वृत्त - शाब्बाश बापू..! अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे मोठ्या विक्रमाची नोंद
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर राज्य सरकराने लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे. ठाणे, पुणे, नाशिक, अकोला आणि नागपूर जिल्ह्यात अल्पावधीतच कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा राज्य शासनाने धसका घेतला असून, याबाबत कठोर नियमावली पुन्हा लागू करण्याच्या विचारात सरकार आहे. देशाचा विचार केला असता, केरळ आणि महाराष्ट्राची रुग्ण संख्या ७२ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात ३७३८३ सक्रिय रुग्ण आहेत.
सविस्तर वृत्त - ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभांमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त - संजय राठोड प्रमुख मंत्री असल्याने हा विषय सरकारचा- संजय राऊत
मुंबई - राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र आजही नागपूर पालिका, मुंबई महापालिका, पुणे पालिका, अमरावती पालिका, पुणे, नाशिक पालिका, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, अमरावती या विभागात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.
सविस्तर वृत्त - राज्यात 'या' विभागात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण
गडचिरोली - जंगलामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवत असताना २०१९ मध्ये विशेष अभियान पथकातील पोलीस जवानांवर अंदाधुंद गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याप्रकरणी महिला नक्षल आरोपीस गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पार्वती उर्फ सुशीला शंकर मडावी (वय 28 वर्ष राहणार मढवेली ता. भामरागड) असे तिचे नाव आहे.
सविस्तर वृत्त - पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षलवादी महिलेस 10 वर्ष कारावास
मुंबई - राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लागू केली आहे. या योजनेत अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ३० हजारांपर्यंतच्या उपचारांची व आर्थिक मदतीची हमी मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबतचे अध्यादेश काढले आहेत.
सविस्तर वृत्त - बाळासाहेब ठाकरे विमा योजना: अपघातातील जखमींना सरकारकडून उपचाराची हमी
मुंबई- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी होत असताना दिल्ली पोलिसांतर्फे वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला होता, तर निकिता जेकब यांची बाजू मिहीर देसाई यांनी मांडली. मंगळवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बुधवारी या संदर्भात निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत निकिता जेकब यांना अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त - निकिता जेकब यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल 2021तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल 2021 पासून घेण्यात येणार आहे. राज्य शिक्षण महामंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.