मुंबई - अमेरिका, ब्राझील, ब्रिटनप्रमाणे आता भारतातही कोरोनाचे म्यूटेशन झाले आहे. डबल म्यूटेशनचा कोरोना विषाणू भारतात कहर माजवत आहे. यात ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, वास, चव जाणे ही लक्षणे कायम आहेत. पण त्याचवेळी जर तुम्हाला चव लागत नसेल आणि जीभ पूर्णतः पांढरी होऊन ती सुजली असेल तर तुम्हाला तात्काळ कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे. कारण ही नव्या म्यूटेशनची नवीन लक्षणे आहेत. या लक्षणाला शास्त्रज्ञांनी 'कोविड टंग' असे नाव दिले आहे. तेव्हा अशी लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नका, असे आवाहन डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.
चार कोरोना रुग्णांपैकी एकाला 'कोविड टंग' -
मार्चमध्ये कोरोनाची मोठी दुसरी लाट राज्यात, देशात आली आहे. त्यातही कोरोना विषाणूने आपल्या जनुकीय रचनेत मोठे बदल केले आहेत. हा नवा कोरोना घातक आहे. कारण तो आधीच्या कोरोना पेक्षा कित्येक पट वेगाने पसरत आहे. त्यामुळेच राज्यात दिवसाला 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, रेमडेसिवीरची टंचाई, बेड उपलब्ध न होणे अशी संकटे आ वासून उभी आहेत. अशात आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ती म्हणजे 'कोविड टंग' नावाची नवीन लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या आता राज्यात वाढत चालली आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये जानेवारीमध्ये कोरोना रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून आली. यावर अभ्यास करत या देशांनी कोविड टंग नावाने जीभेशी संबंधित लक्षणाचा कोरोनाच्या लक्षणात समावेश केला आहे. तर अमेरिका-ब्रिटनमधील अभ्यासानुसार चार कोरोना रुग्णांपैकी एका कोरोना रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून येत आहेत.
दरम्यान डबल म्यूटेशनच्या कोरोनाची लागण झाल्यास आता ताप आणि इतर सर्वसाधारण लक्षणाबरोबर कमालीची डोकेदुखी रुग्णांना जाणवते आहे. तर डोळे प्रचंड लाल होणे, डोळे येणे, कमी ऐकू येणे, अंगावर पुरळ येणे, उलटी, पाण्यासारखे जुलाब अशी ही नवनवीन लक्षणे दिसून येत असल्याचेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे.
घाबरू नका!
कोविड टंग लक्षणे आता रुग्णांमध्ये वाढू लागली आहेत. पण यामुळे घाबरू नका. अशी कोणतीही लक्षणे असल्यास आधी कोरोना चाचणी करा, असे आवाहन डॉ. राधाकृष्ण लोंढे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र यांनी दिली आहे. चाचणी पॉझिटिव्ह असल्यास योग्य उपचार घेतल्यास अगदी पाच ते सात दिवसांत रुग्ण ठणठणीत होतात. जिभेचा रंग पूर्ववत होतो, चव येते, भूक लागते आणि रुग्ण कोरोना मुक्त होतो. त्यामुळे कोविड टंगला घाबरू नका, योग्य आणि वेळेवर उपचार घ्या असेही डॉ. लोंढे सांगतात.