मुंबई - केंद्रीय मंत्रालयाच्यासेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने विरोध केला आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी करत शुक्रवारी आयएमएने देशव्यापी संप पुकारला होता. हा संप यशस्वी झाला असल्याची माहिती डॉ पंकज बंदरकर, सचिव, आयएमए, महाराष्ट्र यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
आयुर्वेदाला वा आयुष डॉक्टरांना आमचा विरोध नाही -
आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला आयएमएने विरोध केला असून त्यासाठी आज 12 तासाचा संप केला होता. तर त्यांच्या याविरोधानंतर आयएमए विरुद्ध आयुष डॉक्टर असा संघर्ष पेटल्याचे म्हटले जात आहे. डॉ बंदरकर यांनी मात्र आपला विरोध कुठेही आयुर्वेदाला वा आयुष डॉक्टराना नाही, हा मोठा गैरसमज पसरवला जात आहे. आमचा विरोध हा आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी देण्याबाबत आहे. ऍलोपॅथीतील एक तज्ज्ञ सर्जन तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्षे लागतात. त्यानंतर ही अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेत सर्जन तयार होतो. अशावेळी आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरला फक्त काही प्रशिक्षण देत 58 शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात अनेक नाजूक आणि महत्वाच्या शस्त्रक्रियाचाही समावेश आहे. यामुळे हा निर्णय म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे असे आम्हाला वाटते. म्हणूनच या निर्णयाविरोधात आमचा लढा आहे. कोणत्याही पॅथी विरोधात आमचा लढा नाही असेही ते म्हणाले.
लढा सुरूच राहणार -
सरकारने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी देण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सर्व पॅथीची सरमिसळ करत 'मिक्सोपॅथी' ही संकल्पना ही पुढे आणली आहे. ही तर वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा या चुकीच्या निर्णयाविरोधात आम्ही एक लढा उभारला आहे. हे चुकीचे निर्णय त्वरित रद्द करावेत अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आज जो संप पुकारला होता त्याला चांगला प्रतिसाद देशभर मिळला आहे. संप यशस्वी झाला आहे. तर आता केंद्राने लवकरात लवकर हे निर्णय मागे घेतले नाही तर लोकशाही पद्धतीने ज्या प्रकारे आंदोलन करता येईल ते आम्ही करणार आहोत.नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करत त्यांचे ही समर्थन मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच गरज पडल्यास आम्ही न्यायालयात ही जाऊ. पण हा लढा यशस्वी केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा इशारा ही डॉ बंदरकर यांनी दिला आहे.