मुंबई - पदोन्नतीतील आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतलेले राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आता या विषयावर लोकप्रतिनिधी आणि अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांना आपल्यासोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. आज (मंगळवार २५ मे) रोजी राखीव मतदारसंघाचे आमदार, खासदार यांच्यासोबतच मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संघटनांसोबत ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे.
या विषयावरील पुढील भूमिका ठरविण्याच्यादृष्टीने या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत. डॉ. राऊत यांनी या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक दोन दिवसात बैठक न लावल्यास मंत्रीमंडळ बैठकीत या विषयावरून सरकारला धारेवर धरण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या विषयावर काँग्रेस पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित केलेल्या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत.
आज दुपारी १२ व ३ वाजता बैठकी -
पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आज दुपारी १२ वा. राखीव मतदार संघातील खासदार व आमदार यांच्या समवेत एक बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर दुपारी ३ वा. राज्यातील आरक्षण हक्क कृती समिती, आरक्षण बचाव कृती समिती व इतर मागासवर्गीयांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा - ...तर देशातील ९ लाख औषध विक्रेते, वितरक जाणार बेमुदत संपावर